प्रवरानगर (जि. अहमदनगर) : बाळासाहेब विखे यांनी शेती व ग्रामीण शिक्षणात महत्त्वपूर्ण प्रयोग करुन गावांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन राज्याच्या विकासासाठी समर्पित होते. शेती क्षेत्राबाबत त्यांनी जो मूलभूत विचार केला होता त्याची उत्तरे नवीन कृषी सुधारणांमध्ये मिळतात, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पद्मभूषण, लोकनेते दिवंगत डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन व प्रवरा शिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळा मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हर्च्युअल पद्धतीने झाला. या कार्यक्रमासाठी मोदी हे दिल्लीहून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून आॅनलाईन उपस्थित होते. येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे , खासदार डॉ. सुजय विखे आदींची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
मोदी यांनी शिवाजी महाराजांना वंदन करुन मराठीत भाषणाला सुरुवात केली. आत्मचरित्रातील काही उतारे व संदर्भही त्यांनी मराठीतूनच कथन केले. ते म्हणाले, या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी मी प्रत्यक्ष येणार होतो. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेबांनी काम केले. गाव, गरीब आणि शेतकरी यांचे जीवन सुखकर करण्यासाठी त्यांनी राजकारण व सत्तेचा वापर केला. सहकार ही निधर्मी चळवळ असून ती जाती-धर्माची बटिक नसल्याची मांडणी करत विखे यांनी सहकार व सिंचनाबाबत मूलभूत काम केले. शेतीला उद्योग का समजत नाहीत? हा त्यांचा प्रश्न होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर नवीन कृषी सुधारणांमध्ये आहे. बाळासाहेब विखे यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण काम केले, असे फडणवीस यांनी सांगितले.कोंडला गेलेला हिरा : उद्धव ठाकरेबाळासाहेब विखे ही मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. ते व्यवस्थेचे शिकार झाले नाहीत, तर आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवस्था बदलवली. हे घराणे मूळचे काँग्रेसचे. पण असे असतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत घेतले. हा कोंडला गेलेला हिरा मंत्रिपद देऊन अटलजींच्या सरकारमध्ये कोंदणात बसविला. ठाकरे व विखे घराण्याचे ऋणानुबंध असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.