मुंबई: भारताला १९४७ मध्ये भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, या अभिनेत्री कंगना राणौतच्या विधानांना पाठिंबा दिल्यानं अभिनेते विक्रम गोखलेंवर टीका झाली. त्यानंतर आज गोखलेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं गोखले म्हणाले. मला माझं मत कोणावरही लादायचं नाही. पण माझं मत बदलणार नाही, असं गोखलेंनी सांगितलं.
माझी कंगनाशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही. १८ मे २०१४ रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असं विक्रम गोखले म्हणाले.
२०१४ पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आणि ते मी मुळीच बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी त्या मूळ भाषणात असं म्हणालो की, दे दी हमे आझादी बिना ढाल. म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही? याचा मला राग आला, असं मत गोखलेंनी व्यक्त केलं.