मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना आणि ‘राजकपूर विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. या ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. राज्य शासनाच्या वतीने वांद्रे रिक्लेमेशन येथील म्हाडा मैदान क्र. १ येथे यंदा ५४ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ््यात या चौघांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार घोषित झाल्याचा आनंद आहे. मात्र, या पुरस्कारामुळे भारावून न जाता अधिक जोमाने कामाला लागणार आहे. आपल्या कामाला मिळालेली दाद प्रत्येक वेळी जबाबदारी अधिक वाढतेय, याची जाणीव करून देणारी असते.- अरुण नलावडे
विक्रम गोखले, सायरा बानो यांना राज्याचा ‘जीवनगौरव’
By admin | Published: April 20, 2017 6:15 AM