ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १४ - महाराष्ट्राची स्थिती भक्कम करण्याच्या वज्रनिर्धारानेच आम्ही दोघांनी फलंदाजी केली. विक्रमाचा डोक्यात विचारही नव्हता. यादरम्यान विक्रम झाल्याने निश्चितच आनंद वाटतोय. स्वप्नील व माझा एकेरी-दुहेरी धावा काढून दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने मुंबई येथून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. अंकित बावणेचे हे प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीतील पहिलीच डबल सेंचुरी आहे.
मी ब-याच वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळे दिल्लीसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध नाबाद २५८ धावांची खेळी करता आल्याचे वेगळे समाधान वाटत आहे. या लढतीकडे निवड समितीचेही लक्ष असल्यामुळे ही खेळी आपल्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण अशी आहे. वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक आहे; परंतु आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यास हा सामना निर्णायक जिंकण्याची आम्हाला संधी आहे.
त्यामुळे आमचा सामना जिंकण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न असणार आहे. या खेळीमुळे या हंगामात त्रिशतक झळकावू शकतो याचा आत्मविश्वासही निर्माण झाला असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. शुक्रवारी अंकित बावणे आणि स्वप्नील गुगळे या महाराष्ट्राच्या दोन फलंदाजांनी दिल्ली संघाविरुद्ध तिस-या गड्यासाठी ५९४ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचताना अनेक विक्रमे मोडले.
या जोडीने १९४७ साली विजय हजारे व मोहम्मद यांचा ५७७ धावांच्या तिसºया गड्यासाठीच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. त्याचप्रमाणे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिसºया गड्यासाठी दुस-या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी रचली. प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात श्रीलंकेच्या कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनी २00६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलंबो येथे तिस-या गड्यासाठी ६२४ धावांची भागीदारी केली होती.