मुंबई : विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकणे दुर्दैवाने वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या जिवावर बेतले. दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शिंदे यांची लीलावती रुग्णालयात बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी सांत्वनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालत शिंदे यांच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पोलीस कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने विलास शिंदे यांना शहीद घोषित केले. तर त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेले विलास शिंदे हे २२ आॅगस्टच्या दुपारी खारमधील एस.व्ही. रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत होते. दुपारच्या सुमारास विना हॅल्मेट भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला त्यांनी अडवून त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नसल्याने या तरूणांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. एवढेच नाहीतर त्याने आपल्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. लाकडी बांबू घेऊन तेथे पोहचलेल्या अहमद मोहम्मद अली कुरेशी (२२) यान बांबूचा जोराचा फटका शिंदे यांच्या डोक्यात मारला. फटका वर्मी बसल्याने रक्तबंबाळ होऊन शिंदे रस्त्यावर कोसळले. जखमी अवस्थेतील शिंदे यांना उपचारांसाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे १७ वर्षीय तरूणाला अटक करत त्यापाठोपाठ अहमद यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. १७ वर्षीय आरोपीची बालसुधारगृहात तर अहमद याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शिंदे यांच्या मृत्यूनंतर याप्रकरणी भादंवी कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.वरळीतील बीडीडी चाळीत राहत असलेल्या शिंदे यांच्या पाठीमागे पत्नी, विवाहित मुलगी आणि तरूण मुलगा, असा परिवार आहे. शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉक्टरांनाही अश्रू अनावर !'शिंदे यांच्या मृत्यूने आम्हालाही धक्का बसल्याचे लीलावती रुग्णालयाचे कन्सल्टंट सर्जन डॉ. अतुल गोयल यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. शिंदेंच्या हल्लेखोराला वेडा म्हणावे की, अजून काही तेच आम्हाला समजत नाही. त्याने ज्याप्रकारे शिंदेंना मारहाण केली त्यात त्यांच्या मेंदूचा एक बाजू निकामी झाली. ज्यामुळे ते कोमात गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ‘रोजचेच मढे, त्याला कोण रडे’, अशी डॉक्टारांची अवस्था असते. मात्र, आज शिंदेंच्या मृत्यूने आम्हालाही अश्रू आवरले नाही, असे डॉ. गोयल म्हणाले....आणि ती इच्छा अपूर्ण राहिलीशिंदे यांनी त्यांच्या आईकडे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मत्यूनंतर त्यांचे अवयव दानासाठी मात्र ठरले नाही. त्यामुळे ती इच्छा अपूर्णच राहिली. शिंदे यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना श्रद्धांजली म्हणून मुंबईतील वाहतूक पोलिसांनी शिंदे कुटुंबाला एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सुमारे ३ हजार ५०० वाहतूक पोलीस असून त्यांच्या एक दिवसाच्या पगारातून सुमारे ३० ते ३५ लाख रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिंदे कुटुंबाच्या स्वाधीन केली जाईल, अशी माहिती आहे.शिरगाव पंचक्रोशीवर शोककळाशिरगाव (ता. वाई) गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील कर्मचारी विलास विठोबा शिंदे यांचा बुधवारी मृत्यू झाल्याचे समजताच शिरगावसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे यांच्यासारख्या राजामाणसाला गाव मुकले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पंचक्रोशीतून होत आहे. विलास शिंदे यांचे वडील विठोबा शिंदे हेही मुंबई पोलिस दलातच सेवेत होते. त्यामुळे विलास शिंदे यांचे शिक्षण मुंबईतच झाले. परंतु त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची गावाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. वडील निवृत्त झाल्यानंतर शिरगावातच राहायला आले. आई-वडील गावाकडेच असल्याने विलास शिंदे नेहमी शिरगावला येत जात असत. चिंचपोकळी येथे असलेल्या शिरगावकरांच्या अजिंक्य नवतरुण मंडळाच्या ते नेहमी संपर्कात असायचे.अतिशय दुर्दैवी घटना - मुख्यमंत्रीपोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना झालेली मारहाण आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून शिंदे कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची सरकार पुरेपूर काळजी घेईल. परंतु सर्वांनीच कायदा पाळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. फडणवीस यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
जखमी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू
By admin | Published: September 01, 2016 6:40 AM