- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - दुचाकीस्वारांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांची नेत्रदान करण्याची इच्छा होती. विलास शिंदेच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. शवविच्छेदनानंतर यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर विलास शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील निवासस्थानी आणलं जाणार आहे.
कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वारावरुन झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूचे पडसाद पोलीस कॉलनीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. 'पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर देण्यात आल्या. आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.
'ही दुर्देवी घटना असून आम्ही सर्व त्यांच्या दुखात सामील आहोत. सरकारकडून विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना पुरेपूर मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल', असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलं.
दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांचं बुधवारी निधन झालं. गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. संध्याकाळी सात वाजता त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
दरम्यान, विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे.