विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ३०० गावांमध्ये ग्राम परिवर्तनाची ही अनोखी योजना सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज फाऊंडेशनची आढावा बैठक झाली.त्यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, जलसंधारण मंत्रीप्रा. राम शिंदे, उद्योजक रॉनी स्क्रूवाला, जरीना स्क्रूवाला, अजय पिरामल, अमित चंद्रा, पार्थ जिंदाल, शिखा शर्मा, संजीव मेहता, हेमेंद्र कोठारी, निखील मेस्वानी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पोपटराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.या फाऊंडेशनच्या माध्यमातून खेड्यापाड्यात पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालये,स्वच्छता, समूह शेतीचा विकास, त्यासाठीचे प्रशिक्षण, शेतमालाचे मार्केटिंग, दुर्गम भागात टेलिमेडिसिनची सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हीटी, घरकूल योजना, कौशल्य विकास, जलसंचय आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सीएसआर निधी, राज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून गावांचा विकास करण्याची ही योजना आहे.३०० गावांपैकी १५० गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नेमण्यात आले आहेत. ते फाऊंडेशन आणि ग्रामस्थ, ग्राम पंचायतींशी समन्वय राखून करतील आणि गावातच राहतील. एकूण २०० कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत.आतापर्यंत फाऊंडेशनला हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ग्रूप, रिलायन्स फाऊंडेशन, अॅक्सिस बँक फाऊंडेशन, एचटी पारेख फाऊंडेशन, जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, स्वदेस फाऊंडेशन, सायस्का एलईडी यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे.या कंपन्यांनी येत्या तीन वर्षांत एकूण ९० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. १० कोटी रुपयांचा भार राज्य शासनाने उचलला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे.कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशासन, कॉपोर्रेट आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ही चळवळ निश्चितच आदर्शवत आहे.- रतन टाटा, प्रख्यात उद्योगपती
३०० गावांमध्ये ग्रामपरिवर्तनाची योजना, १५० गावांमध्ये नेमले मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:15 AM