मुंबई : भारतीय जनता पार्टीने देशासह राज्यात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत पक्षाला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्याची इच्छा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, कोकणाला मुंबईशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी ‘गाव प्रमुख’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असल्याचे लाड यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये बोलताना सांगितले.प्रसाद लाड म्हणाले की, कोकणाच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. सरासरी कोकणाच्या प्रत्येक गावातील एक व्यक्ती मुंबईत रोजगारासाठी कामाला आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील लोकांना त्यांचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे, याची माहिती नसते. त्यामुळे मुंबईत कामाला असलेल्या कोकणातील चाकरमान्याला ‘गाव प्रमुख’ म्हणून नेमण्यात आले आहे. हा ‘गाव प्रमुख’ गावपातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका साकारेल. जेणेकरून ग्रामपातळीवरील समस्या मंत्रालयात अडकून न राहता तत्काळ सोडवल्या जातील. अशा प्रकारे आत्तापर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ३ हजार ८०७ गावांसाठी सुमारे २ हजार गाव प्रमुखांची नेमणूक केलेली आहे. यामुळे गावकऱ्यांना थेट सरकारसोबत संपर्क साधता येणार आहे.कोकणासह राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम भाजपाने हाती घेतले आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील ५ हजार सुशिक्षितांना नोकरी न देता येत्या सहा महिन्यांत स्वयंरोजगार देणार असल्याचे लाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, या अभिनव संकल्पामध्ये तरुणांना भांडवल उपलब्ध करून देत व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून प्रत्येक युवक उद्योगपती होईल. यामुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)>‘ब्रेड बास्केट’ सुरू करणार!युरोपात ‘ब्रेड बास्केट’ संकल्पनेतून पर्यटकांना आकर्षित केले जाते. या संकल्पनेत पर्यटकांना समुद्रकिनारी राहण्यासोबत सकाळच्या न्याहरीची व्यवस्था केली जाते. राज्यात सर्वाधिक आणि सलग पट्ट्यातील समुद्रकिनारा कोकणाला लाभला आहे. त्यामुळे कोकण पर्यटनाद्वारे ‘ब्रेड बास्केट’ संकल्पनेतून २ हजार गावांचा विकास केला जाईल.>पर्यटनाच्या समृद्धीकडेकोकणातील पर्यटन व्यवसायात वृद्धी व्हावी, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालत असल्याचे लाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, कराड-चिपळूण रेल्वेमार्ग, मुंबई-गोवा बायपास अशा अनेक प्रकल्पांची घोषणा झाली असून ते तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करून फळबागांसाठी प्रोसेसिंग युनिट्स उभारले जातील. जेणेकरून येथील तरुणांवर स्थलांतर करण्याची वेळ उद्भवणार नाही.>कामाची पावती मिळणार!याआधी म्हाडाचे सभापती म्हणून मी केलेल्या कामाचा फायदा पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, म्हाडाबाबत लोकांच्या मनात जी भावना आहे, ती बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी शासनाने विविध योजनांवर काम केले आहे. लवकरच स्वस्त घरांबाबत शासन घोषणा करेल. शिवाय याआधी मी स्वत: सभापती असताना अनेक संस्थांना मदत केलेली आहे. त्याची पावती म्हणून लोक पक्षाला येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर घेऊन जातील, यात शंकाच नाही.
कोकणाला जोडण्यासाठी ‘गाव प्रमुख’ योजना
By admin | Published: October 19, 2016 2:02 AM