रूपेश उत्तरवार, यवतमाळविद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेत गावकरी वाचनालयाची निर्मिती केली. यासाठी लोकसहभागही लाभला आहे. या ठिकाणी २०० पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. १५ हजार रुपयांचा निधी पालकांनी गोळा केला आहे. तरंगते वाचनालय, अंगण वाचनालय आणि घरपोच पुस्तके मिळावी म्हणून फिरते वाचनालय साकारण्यात येत आहे. पुसद तालुक्यातील भंडारी गावामध्ये ग्रामस्थांनी गावकरी वाचनालय शाळास्तरावर सुरू केले. प्रत्येकाने दर महिन्याला १० रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. यातून दरमहा वाचनालय समिती हा निधी शाळास्तरावर गोळा करते. यात जमलेल्या पैशातून पुस्तके खरेदी केली जातात. या वाचनालयात २०० पुस्तके आहेत. विज्ञानविषयक गोष्टी, प्रेरणादायी विचार, कथा-कादंबऱ्या अशा विविध विषयांची पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.वाचनालय समितीकडे १५ हजार रुपयांचा निधी आतापर्यंत गोळा झाला. यातून वाचनालयात पुस्तके खरेदी करण्यात आली. शाळेच्या वेळेत हे वाचनालय विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे वर्गामध्ये तरंगते वाचनालय ही संकल्पना साकारण्यात आली आहे. शाळेच्या एका कोपऱ्यात तारांवर पुस्तके लटकविण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकांकडे सहज लक्ष जाते. यातून ही पुस्तके वाचली जातील, अशी मूळ संकल्पना आहे. यासोबतच ग्रंथपाल म्हणून विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये हे वाचनालय सुरू राहणार आहे. अंगण वाचनालय या संकल्पनेतून विविध विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातील.
लोकसहभागातून उभे राहिले गावकरी वाचनालय
By admin | Published: April 27, 2015 3:31 AM