राजेश निस्ताने
यवतमाळ, दि. २० - संकटात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण स्तरावरील निवडणुकीत पॅनल टाकणारा गावपुढारी यवतमाळातील एका सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष असे त्याच्यावर पुण्यातही दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याने यवतमाळ पोलिसांनी तपासाची दिशा पुण्यावर केंद्रीत केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, संजय विठ्ठलप्रसाद मिश्रा उर्फ पंडित मिश्रा (४२) असे या मास्टर मार्इंडचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत काळीदौलत सर्कलमधील कान्हा (ता. महागाव) या गावातील तो रहिवासी आहे. यवतमाळात २३ जानेवारी २०१६ रोजी गजबजलेल्या दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्या घरी दुपारी १२ वाजता पडलेल्या दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे.
या दरोड्यात आठ सदस्यीय टोळीचा सहभाग आढळून आला. यातील सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन रिव्हॉल्वर, ११ राऊंड, सात मोबाईल, खंजर, वायर, हॅन्डग्लोज, हे साहित्य ठेवले जाणारी बॅग आदी जप्त करण्यात आले. या टोळीमध्ये अकोला जिल्ह्यातील पारसचे दोन, यवतमाळच्या समर्थवाडीतील एक, नवीन पुसदच्या स्टेट बँकेजवळील एक, उमरखेडमधील एक आणि कान्हा गावातील दोन सदस्य सहभागी आहेत.
संजय मिश्रा हा या टोळीचा मास्टर मार्इंड असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. त्याने अलिकडेच ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या गटाचे पॅनल रिंगणात उतरविले होते. सहकारातील गाव-तालुकास्तरावरील अनेक निवडणुकांमध्येसुद्धा त्याने पॅनल प्रमुख म्हणून सहभाग घेतला. कान्हा व परिसरातील गावामध्ये तो ‘मसिहा’ म्हणून ओळखला जातो. गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, शिक्षणासाठी पैसा देणे, गावातील अडलेली विकासाची कामे स्वखर्चातून मार्गी लावणे, पथदिवे लावणे यामुळे तो गावात लोकप्रिय होता. त्याच्या अभिनंदनाचे फलक गावात झळकत होते. अनेकदा वृत्तपत्रातील जाहिरातींमधूनही त्याचे दर्शन होत होते.
संजय उर्फ पंडित मिश्रा याच्यावर पुणे आयुक्तालयातसुद्धा दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. फाटक यांच्याकडील दरोड्याच्या वेळी तीन जण घरात शिरले होते. मात्र इतर सदस्य घराबाहेर पाळतीवर असल्याचे सांगण्यात येते. त्यात पंडितचाही समावेश होता, असे पोलीस तपासात आढळून आले. फाटक यांच्याकडील दरोड्यात सहभागी असलेल्या याच टोळीचा पुसद येथील शासकीय कंत्राटदार चिद्दरवार यांच्याकडील दरोड्यातही सहभाग असावा, असा संशय स्थानिक गुन्हे शाखेला त्यांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून वाटतो आहे.पोलिसांनी केला सत्कारकान्हा गावात ‘मसिहा’ म्हणून वावरणाऱ्या पंडित मिश्रा याचा पुसद येथे पोलिसांच्यावतीने मे २०१६ ला सत्कार करण्यात आला होता. पोलिसांनी कल्याण निधीसाठी आॅर्केस्ट्रा आयोजित केला होता. या आॅर्केस्ट्राच्या सुमारे ६० हजारांच्या तिकीट त्याने खरेदी केल्या होत्या. म्हणूनच त्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता, अशी माहिती पुढे आली आहे.