गिरड : पाऊस पडावा यासाठी बेडकांचे लग्न लावण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण दुष्काळामुळे बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याचा अनोखा प्रकार वर्ध्यामध्ये घडला आहे. पण बाहुला-बाहुलीचे लग्न नेमके कशासाठी? असा प्रश्न पडला असेल ना. चला पाहुया.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ या गावात गेल्या पन्नास वर्षांत कधीही दुष्काळ पडला नव्हता. मात्र, पहिल्यांदाच यंदा दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमालीचे घटले आहे. यामुळे यंदा गावातील 22 तरुण आणि 2 तरुणींचा विवाहसोहळा लांबणीवर पडला होता. मात्र, गावात यंदा एकही लग्न होणार नाही या कल्पनेनेच गावकऱी अस्वस्थ झाले होते.
दुष्काळी परिस्थितीमुळे विवाह कार्य होऊ शकले नसल्याने गावकऱ्यांनी एकोप्यातून विवाहाच्या परंपरेनुसार बाहुला-बाहुलीचाही विवाह पार पाडला. वधू आणि वर मंडपी हिरवा मांडव टाकला तसेच हळद आणि अहेराचीही देवाण-घेवाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर पाच जोडप्यांची अंघोळ आणि चोरपाणी घालून सर्व सोपस्कार पार पाडले. गावातील हनुमान मंदिराच्या सभागृहात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याने वरपक्षाकडील मंडळी गावातून ढोल-ताशाच्या तालावर नाचत वधू मंडपी पोहोचली. यावेळी गावातील आबालवृद्धांचाही समावेश होता.
पाहुण्यांचा मानपान करून विवाहस्थळी बाहुला-बाहुलीला आणले. त्यानंतर सनई चौघड्याच्या सूरात मंगलाष्टके म्हणून अक्षतांची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला उपस्थित वऱ्हाड्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आजुबाजुच्या गावातील सरपंचही उपस्थित होते. शिवणफळ गावातील नागरिकांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहीक वर्गणीतून कमी खर्चात सर्वाच्या सहकार्याने एक आदर्श विवाह पार पाडता येतो, असा संदेश सर्वांना दिला. या अनोख्या विवाह सोहळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.