मनीषा म्हात्रे, मुंबईगेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील एका खेडेगावातून गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली फोन कॉल करण्यात येत आहेत. त्यातूनच पुढे नागरिकांचे अपहरण करून खंडणी उकळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील गुन्हे शाखेच्या उपायुक्ताचेही अपहरण करून लुटण्याचा प्रयत्न झाला, आणि ही टोळी फसली. पोलिसांनी या गावातील तिघांना अटक करून गुप्तधन मिळवून देणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात अवघी १४५ कुटुंबे असलेले गडी झिलपट्टी हे छोटे खेडेगाव आहे. या गावातील गावकरी मुंबई परिसरात व्यापारी, धनाढ्य व्यक्तींची माहिती आणि मोबाइल क्रमांक मिळवत असत. त्यानंतर खोदकामावेळी गुप्तधन सापडल्याची माहिती या धनाढ्य व्यक्तींना फोनवर देत असत. अधिक माहितीसाठी त्या व्यक्तींना गाठून ही टोळी त्यांना जाळ्यात ओढून या धनाढ्यांची भेट घेऊन त्यांना गावकऱ्यांकडून खरे सोने दाखविले जात असे. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून उर्वरित गुप्तधनाच्या व्यवहारासाठी त्यांना थेट भरतपूरमधील गावी बोलावले जायचे. एकदा सावज जाळ्यात अडकल्यानंतर त्या व्यक्तीचे अपहरण करून ही गावकरी मंडळी खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. या टोळीच्या कार्यपद्धतीनुसार या कटातील प्रत्येक जबाबदारी वेगवेगळ्या सदस्यांवर सोपवण्यात येते. कारवाईसाठी गेल्यानंतर गावाकडून प्रचंड विरोध होतो. अनेकदा पोलिसांवर मार खाण्याचीही वेळ ओढावत असल्याचे स्थानिक पोलिसांसह मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. पर्यायाने स्थानिक पोलीस कारवाईस धजावत नाहीत. या टोळीकडून मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना कॉल गेला. या टोळीने कुलकर्णी यांनाही गुप्तधनाची माहिती देऊन अपहरणाचा डाव रचला. गेला महिनाभर ही मंडळी कुलकर्णी यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्कात होती. या टोळीसाठी सापळा रचत असतानाच व्ही.पी. रोड परिसरातील भंगार व्यावसायिकाची गुप्तधनाच्या नावाखाली गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. संबंधिताने व्यापाऱ्याच्या कुटुंबाकडून १० लाखांची मागणी केली होती. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलकर्णी यांनी खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विनय वस्त त्यांच्याकडे सखोल तपासाची जबाबदारी सोपविली. व्यावसायिकाच्या कुटुंबीयांकडून खंडणीची रक्कम मिळताच १५ दिवसांनंतर त्याची सुटका करण्यात आली. व्यापाऱ्याची सुटका होताच वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी या गावात सापळा रचला. मात्र तेव्हा गावातील रहिवाशांनी कारवाईस प्रचंड विरोध केला. अनेक जण पोलिसांच्या अंगावर धावून आले. तरीदेखील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडे केलेल्या चौकशीत अख्खे गाव खंडणी प्रकारात गुंतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीतील आणखी एक साथीदार पोलिसांच्या गळाला लागला आहे. मंगळवारी खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली. इरफान असरू खान (२५) असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे.
राजस्थानातील गावच खंडणीखोर
By admin | Published: February 03, 2016 3:23 AM