- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि.ग कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी ते घरात पडले होते, त्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत माजवली. त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी सदाशिव पेठेतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, दिलीप माजगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
इस्त्रायल-युद्ध, युद्ध आणि युद्धच, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘विन्स्टन चर्चिल’, ‘महाभारताचा इतिहास’, ‘होरपळ’ ही कानिटकर यांची पुस्तके साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. वि.ग कानिटकर यांचा जन्म मालाड, मुंबई येथे 26 जानेवारी 1926 रोजी झाला. बी.एसस्सी आणि बी.ए (ऑनर्स) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. केंद्र सरकारच्या अकाऊंटंट जनरलच्या कचेरीत 37 वर्षे त्यांनी नोकरी केल्यानंतर लेखनामध्ये ते अधिककाळ रमले. इतिहास व चरित्रे याविषयावर त्यांनी विपुल लेखन केले.
यामध्ये ‘माओ क्रांतीचे’, व्हिएतनाम’, ‘अँडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी’, ‘हिटलरचे महायुद्ध’, ‘अब्राहम लिंकन; फाळणी टाळणारा महापुरूष’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘फाळणी: युगांतापूर्वीचा काळोख’ या पुस्तकाला साहित्यसम्राट न.चिं केळकर पारितोषिकही मिळाले आहे. दर्शन ज्ञानेश्वरी गाजलेल्या प्रस्तावना या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाय अशी मुलांसाठी त्यांनी चरित्रेही लिहिली. ‘खोला धावे पाणी’, शहरचे दिवे’ यांसारख्या कादंब-या तसेच मनातले चांदणे’, ‘आसमंत’, ‘सुखाची लिपी’, ‘लाटा’, आणखी पूर्वज’, ‘जोगवा’ हे त्यांचे काही गाजलेले कथासंग्रह आहेत. ‘पूर्वज’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मौलिक लेखन कार्य केले. ‘संस्कार’, ‘वय नव्हतं सोळा’, ‘एक रात्रीची पाहुणी’, ‘अकथित कहाणी’ आणि अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न’ ही त्यांची गाजलेली अनुवादित पुस्तके आहेत.