तर ही कमलनाथ सरकारची ‘मुघली प्रवृत्ती’ : मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:45 AM2020-02-13T09:45:42+5:302020-02-13T09:51:00+5:30
काँग्रेसचे राज्य सरकार हे असे वर्तन करण्यास स्वतःचा मोठेपणा समजत असेल तर त्यांना हा देश माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले.
मुंबई : मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडली आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
तर यावरूनच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. "मुघल त्यांच्या जिवंतपणी स्वराज्याचे काही बिघडू शकले नाही मग हे पुतळा हटवण्याचा प्रयत्न करणारे आजचे कमलनाथ किस झाड की पत्ती आहेत? काँग्रेस या संतापजनक घटनेचे समर्थन करत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर काँग्रेसचे राज्य सरकार हे असे वर्तन करण्यास स्वतःचा मोठेपणा समजत असेल तर त्यांना हा देश माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे.