मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सोमवारी ३६ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनतर आता विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीका होताना पाहायला मिळत आहे. 'हे सरकार तीन तोंडाचे आहे', असे म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले निकालानंतर एकत्र आले. यात शिवसेनेसोबत मित्रपक्ष आले नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज्याच्या मंत्रीमंडळात आपलीही वर्णी लागेल अशी आशा मित्रपक्षांना होती. मात्र पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मित्रपक्ष उपेक्षित राहिले आहेत. तर याच मुद्यावरून विनायक मेटेंनीमहाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मेटे म्हणाले की, आधीच या तीन पक्षाचे तीन तोंडं आहेत. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे वेगवेगळे मित्रपक्ष आहेत. तर सरकार स्थापन करण्यासाठी या तीन पक्षांच्या मित्रपक्षांनी मदत केली होती. सत्तास्थापनेच्या आधी या मित्रपक्षांना आश्वासनं वेगळी दिली आणि आता जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकाराला त्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्यामुळे याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात होईल, असं म्हणत विनायक मेटेंनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.