विनायक मेटे यांनी सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. असा नेता मराठा समाजाला सोडून गेला. मोठे नुकसान झाले. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आहेत, त्यांनी मेटेंचा अपघात झाला तेव्हा तिथे कोणी थांबले नाही. दोन तास अॅम्बुलन्स मिळाली नाही. हा सर्व प्रकार काय आहे, हे आम्हाला समजले पाहिजे. मेटेंच्या मृत्यूमागे घातपात होता का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरेपाटील यांनी केली.
आज मुंबईत बैठक होती. सकाळी ११ वाजता भेटणार होतो, त्यानंतर १२ वाजता बैठक होती. मुख्यमंत्र्यांना काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा मोर्चा शांत बसणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरेपाटील यांनी दिला.
तसेच अॅम्बुलन्सचा कंत्राटदाराची चौकशी व्हावी. मेटेंसारख्या नेत्याला जर अॅम्बुलन्स मिळाली नाही, तर सामान्यांचे काय हाल असतील. यामुळे साऱ्या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी मराठा क्रांतीच्या नेत्यांनी केली आहे.
चालकाने काय सांगितले...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.