विनायक मेटेंच्या अपघाताला एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहतूक जबाबदार आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते जाणार नाहीत. त्यांच्या बाजुने जाण्यास छोट्या वाहनांचे चालक घाबरतात. यामुळे जर एक्स्प्रेस वेचा विस्तार केला तर ट्रक चालकांना दोन लेन देता येतील. कारण त्यांनाही ओव्हरटेक मारावी लागते. यामुळे चौथ्या लेनचा विस्तार सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून लक्षवेधी दाखल करण्यात आली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चा केली. पोलीस ठाण्यांनी हद्दीचा प्रश्न आणू नये. अनेकदा पोलीस हे माझ्या हद्दीत नाही, त्याच्या हद्दीत असेल असे म्हणतात. मेटे यांच्या पत्नीने मला पोलिसांचा प्रश्न सांगितला. एक्स्प्रेसवेवर वेग मर्यादा आहे, आमदारांना लाखा लाखात दंड होतात, अनेकांनी सांगितले की महिन्याचे जे काही मिळते ते सारे तिकडेच जाते, असेही अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या गाडीचा चालक सारखा स्टेटमेंट बदलतोय. यामुळे घातपात झाल्याचा संशय तयार होतोय. यावर सीआयडी चौकशी सुरु केली आहे. मेटेंच्या चालकाने ११२ नंबरवर फोन केल्याचे म्हटलेय. पण त्याने केला की नाही हे समजलेले नाही. या प्रकरणी आणखी एक अधिकारी नियुक्त केला जाईल. अजित पवारांनी महत्वाचा मुद्दा मांडला. एक्स्प्रेस वेवर जी काही कोंडी होतेय, त्यावर तोडगा काढू. चौथ्या लेनचे कामही करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राजकीय नेत्यांना प्रवास करावा लागतो. त्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीस यांनी नेत्यांना केले.