शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा आज अपघाती मृत्यू झाला. एमजीएम रुग्णालयात त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. यानंतर मेटे यांचे पार्थिव पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टेमला नेण्यात आले. मात्र, तिथे इंजेक्शन नसल्याने मेटेंचे पार्थिव जेजे रुग्णालयात हलविण्यात आले.
मेडिकल पर्पजसाठी जे इंजेक्शन लागते ते जेजे रुग्णालयातच उपलब्ध आहे. यामुळे मेटे यांचे पार्थिव पोस्टमार्टेमसाठी जेजे रुग्णालयात हलविण्यात आल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
विनायक मेटे यांचे पार्थिव जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा भक्ति पार्क येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी त्यांच्या मृतदेह बीडला नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
रविवारची सकाळ माजी आ. विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीने उगवली अन् बीडकरांना धक्काच बसला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसंग्राम भवन येथे पोहोचले. यावेळी अनेकांना शोक अनावर होत होता. अंत्यविधी कोठे करायचा, याबाबत कुटुंबियाशी चर्चा करुन अखेर रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले.
शिवसंग्राम भवनपासून निघणार अंत्ययात्राविनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईहून शिवसंग्रामला १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आणण्यात येईल. त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.