बीड: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भाताना बोगद्याजवळ १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. या बातमीने बीडवर शोककळा पसरली. शिवसंग्राम भवन येथे समर्थकांनी एकच गर्दी केली. यावेळी हुंदके व आश्रूंनी परिसर सुन्न झाला होता. दरम्यान, आ. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहरातील कॅनॉल रोडवरील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रविवारची सकाळ माजी आ. विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीने उगवली अन् बीडकरांना धक्काच बसला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसंग्राम भवन येथे पोहोचले. यावेळी अनेकांना शोक अनावर होत होता. अंत्यविधी कोठे करायचा, याबाबत कुटुंबियाशी चर्चा करुन अखेर रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले. शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके , पो.नि. केतन राठोड यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी अंत्यविधी स्थळाची पाहणी केली.
शिवसंग्राम भवनपासून निघणार अंत्ययात्राविनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईहून शिवसंग्रामला १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आणण्यात येईल. त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.