मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. विनायक मेटे मराठी समाजाचे मोठे नेते होते, तसेच त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकारही घेतला होता. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाला मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, आता त्यांच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केली आहे.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. 'डॉ.ज्योती मेटे यांना भारतीय जनता पक्षाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे,' असे ट्विट काकडे यांनी केले आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे, त्यामुळे त्यांनी भाजपकडे अशाप्रकारची मागणी केली आहे.
विनायक मेटेंचे अपघाती निधनशिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर 14 ऑस्टट रोजी पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचे जागीच निधन झाले. अपघाताच्या काही वेळानंतर मेटेंना रुग्णालयात नेले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.