बीड- शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज(14 ऑगस्ट) सकाळी अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोगद्याजवळ मेटेंच्या कारचा भीषण अपघात झाला, यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मेटेंच्या अकाली जाण्यावर दुःख व्यक्त केले.
विनायक मेटे यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. 'ऐवढा हुशार नेता आज हरपला आहे, याचे मला वाईट वाटत आहे. माझी आणि त्यांची काही दिवसांपूर्वीच सागर बंगल्यावर भेट झाली होती, आम्ही बऱ्याच वेळ जिल्हातील प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यावेळी मेटेंकडून मला भेटण्यासाठीचा निरोप आला होता. 15 ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो. मात्र त्यांना काय बोलायचे होते, हे त्यांच्यासोबतच गेले आहे', असे म्हणत पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, 'चंद्रकांत पाटील यांनीच फोनवरुन मेटेंच्या अपघाताची माहिती दिली, नंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. हा खूप मोठा धक्का आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊ संघर्ष केला, चार वेळा आमदार राहिले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बुद्धीकौशल्य, संघटन कौशल्य वापरून त्यांनी मोठी कामे केली. मराठा समाजासाठी त्यांनी एक चळवळ उभी केली. त्यांच्या जाण्याने या चळवळीला मोठा धक्का बसला आहे. मेटेंना मी गेल्या दोन दशकांपासून ओळखत आले. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, मला त्यांच्याविषयी कौतूक वाटायचं,' असंही पंकजा म्हणाल्या.