मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटेंनीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबद्दलची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मेटे २०१५ पासून समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटेंची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानं मेटेंनी राजीनामा दिला आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण राजीनामा स्विकारावा ही विनंती,' असं मेटेंनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा व्यक्त करत असतानाच या कार्यक्रमासाठी माझी काही आवश्यकता भविष्यामध्ये लागल्यास माझे सहकार्य हे सदैव राहील,' असे विनायक मेटे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
आमदार विनायक मेटेंचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 3:50 PM