मुंबई : राज्यातील मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून , यावर लवकरच निर्णय होणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. याच घोषणेवरून शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणजे, 'उठवळ मंत्री' असून, ते समाजाची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत म्हंटलं आहे की, विधान परिषदमध्ये मी धनगर आणि मुस्लीम आरक्षणबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. ठाकरे सरकारमध्ये असलेले नवाब मलिक हे 'उठवळ मंत्री' आहे. मलिक हे मुस्लीम समाजाची दिशाभूल करत असून, सभागृहातंच मी त्यांना हे स्पष्टपणे सांगितले आहे. तर मुस्लीम समाजाला आरक्षण देणे मलिकांच्या हातात नसून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यामुळे आरक्षणाची भूमिका मुख्यमंत्री यांनी आधी स्पष्ट करायली हवी, असे मेटे म्हणाले.
तर, असे असताना सुद्धा आम्ही आरक्षण देणार असे सतत मलिक यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे आरक्षण कसे, किती आणि कुठून देणार आहे. यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची मान्यता घ्यावी लगणार आहे. कॅबिनेटचा सुद्धा ठराव लागणार असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तयारी आहे का ? असा सवालही मेटेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
मुस्लीम आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रम आहे. मलिक यांच्या घोषणेनंतर अवघ्या 2 दिवसात उद्धव ठाकरे यांनी आमचा असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं. यातून मुस्लीम आरक्षणाला उद्धव ठाकरे यांचे विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नावाने नवाब मलिक यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करू नयेत, असा टोलाही मेटेंनी यावेळी लगावला.