Vinayak Raut Criticised Manisha Kayande: शिवसेनेचे वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती मिळाली आहे. पैकी मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, मनिषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे.
१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील आमदार असलेल्या मनिषा कायंदे गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर आता मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. मनिषा कायंदे आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.
गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही
सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधान परिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला. शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही, या शब्दांत विनायक राऊतांनी टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरेंना मानसिक त्रास द्यायचा हा एकमेक धंदा गद्दारांचा
शिंदे गटाने खरेदी-विक्रीचा बाजार सुरू केला आहे. त्यांच्याकडे कोणतेही विचार नाहीत. केवळ उद्धव ठाकरेंना मानसिक त्रास द्यायचा हा एकमेक धंदा गद्दारांचा आहे. बाटगा अधिक कोडगा असतो… तसे हे कोडगे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्यासाठी निघाले आहेत. पण, त्यांचा मनसुबा स्वार्थी लोकांना जवळ घेऊन कधीही पूर्ण होणार नाही, असे सांगत विनायक राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला.