ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ – राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री. मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच यंदाचा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार श्री. शाम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे आज यांनी दिली. येत्या मराठी भाषा गौरव दिनी, २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी हे चारही पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
व्यावहारिक नफा-तोटा न पाहता, प्रामुख्याने राष्ट्रभक्ती व राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा व समाजसेवक असे अनेक विषय व अनुषंगिक विचार विविध चरित्र पुस्तिकांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या भारतीय विचार साधना प्रकाशनास यंदाचा श्री.पु. भागवत पुरस्कार देण्यात येणार आहे.
पर्यावरण आणि वन्यजीवन हे क्षेत्र मराठी भाषेच्या परीघात समृद्ध करणाऱ्या आणि कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी भाषेला असंख्य नवे शब्द देणाऱ्या अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येणार आहे.
अत्त्युच्च त्याग करून सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोहोचविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक श्री. शाम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी व्याकरणाच्या अध्वर्यू आणि कोश, व्याकरणाचे नियम, म्हणी व वाक्प्रचार आणि शालेय शिक्षणातील मराठी या सर्वच बाबतीत उत्तम पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ व भाषाशास्त्रज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांना या वर्षीचा अशोक केळकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.पु. व विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य श्री. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्री. बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, श्रीमती शामा घोणसे व श्री. बाबा भांड यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करून, मा. मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, एकमताने ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेतले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत, असे श्री. विनोद तावडे यांनी नमूद केले.