मुंबई : आपल्याला राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे उद्योगपती अदानी यांनीच म्हटले होते. राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये कोट्यवधी रुपयांची कंत्राटे अदानींनाकाँग्रेसच्या काळातच मिळाली. तिथे ते गोड वाटतात आणि इकडे महाराष्ट्रात नियमानुसार त्यांना कंत्राट मिळाले तर कोणत्या तोंडाने टीका करता, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. ते म्हणाले की, अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना अदानींना ४६ हजार कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प, जयपूर विमानतळाचे कंत्राट मिळाले होते. तेलंगणात रेवंत रेड्डींच्या सरकारने अदानींशी १२,४०० कोटींचे करार केले आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सहा एसईझेड अदानींना बहाल केले, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री असताना खाणींचे कंत्राट दिले, हिमाचलमध्येही कंत्राटे मिळाली. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारशी अदानींचा संबंध जोडून राहुल गांधी हे काँग्रेस व अदानींमधील जुने नाते लपवू पहात आहेत
धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत म्हणूनच विरोध
- धारावी पुनर्विकासात जमिनीचा एक तुकडाही अदानींना दिलेला नाही. ते केवळ विकासक आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेचा अवलंब करूनच त्यांना कंत्राट मिळाले. या प्रक्रियेत दुसरे स्पर्धक हे अबुधाबीचे शेख होते, त्यांना कंत्राट मिळाले नाही म्हणून तर राहुल गांधी टीका करत नाहीत ना?
- गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत. गरीबांना पक्की घरे मिळू नये, त्यांनी आयुष्यभर झोपडीतच रहावे, अशी राहुल गांधींची इच्छा असल्यानेच ते प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असेही तावडे म्हणाले.
तिजोरीवरून खिल्ली
राहुल गांधींनी दिल्लीवरून तिजोरी आणली, मातोश्रीवरून आणायला हवी होती, त्यातून काही तरी निघाले असते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल यांच्या पत्रपरिषदेवर लगावत हा तर निव्वळ बालिशपणा असल्याची टीका केली.