मुंबई : येत्या 12 तारखेला पुढील राजकीय दिशा ठरविण्याचे सुतोवाच देताना भाजपावर नाराज असल्याचे संकेत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. यावरून त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या कुठेही जाणार नसल्याचे सांगताना त्या भाजपातच राहतील असे, स्पष्टीकरण दिले होते.
पंकजा यांनी त्यांच्या ट्विटरवरून भाजपाचा नामोल्लेख काढून टाकला होता. यामुळे चर्चांना पक्षांतराच्या चर्चांना उत आला होता. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा परळीतून या विधानसभेला मोठा पराभव केला होता. तेव्हापासून त्या सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकत होत्या. मात्र, आज त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा भाजपाचे कमळ असलेला फोटो पोस्ट केल्याने त्या भाजपातच असल्याचा संदेश दिला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा मुंडेंच्या भेटीला गेले असून रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू आहे. योगायोगाने कालच हा बंगला शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. यामुळे लवकरच हा बंगला पंकजा यांना सोडावा लागणार आहे. शिवाय आमदारकीही नसल्याने त्यांना कदाचित विधान परिषदेवर घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचे समजते.