विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.मराठी भाषेवरून गेले २ दिवस विधिमंडळात गदारोळ सुरू आहे. काल राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने सदस्यांना इंग्रजी भाषण ऐकावे लागले.मंगळवारी मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...’ या अभिमान गीतातील शेवटचे कडवे न गायले गेल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अमराठी शाळांत मराठी सक्तीची करावी, अशी एकमुखी भावना सभागृहात व्यक्त झाली. कर्नाटकात कन्नड भाषा दहावीपर्यंत अनिवार्य आहे. मग महाराष्ट्रात मराठी अनिवार्य का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मराठी दिनाचे औचित्य साधून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय एकमुखाने घेऊनच टाका, असा आग्रह त्यांनी धरला.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शाळांत मराठीच्या सक्तीची भावना व्यक्त केली. त्याला भाजपा-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर, तावडे म्हणाले की, मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करावी की बारावीपर्यंत, याचा विचार सुरू आहे.सध्या आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे. सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळास कळवून त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल.
दहावीपर्यंत मराठी लवकरच सक्तीची करणार : विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:56 AM