मुंबई : स्वातंत्र्योत्तर काळात राजेशाही समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या व्हिंटेज कार मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा धावताना पाहून नेहमी घाईत असणारा मुंबईकर क्षणभर थांबला. व्हिंटेज कार फिएस्टाच्या निमित्ताने रविवारी दुर्मीळ कारच्या दिमाखदार रंगसंगती मुंबईकरांना बघता आल्या.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व्हिंटेज कार, बाइक आणि स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या वेळी पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होत्या. हार्निमन सर्कल ते वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला सुरुवात होताच रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांनी गर्दी केली.अनेक शतकांपूर्वी कार, बाइक आणि स्कूटरनी चालकांवर भुरळ घातली होती. काळ गेला तंत्रज्ञान बदलले, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त गाड्या बाजारात दाखल आहेत. मात्र ‘त्यांची’ शान आजही कायम असल्याचे चित्र बघ्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. रॅलीत सुमारे २०२ कार, बाइक आणि स्कूटर यांचा समावेश होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीने हळूहळू वेग प्राप्त केला. रॅलीत स्वातंत्र्योत्तर काळातील दुर्मीळ कारने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. दुर्मीळ बाइक आणि स्कूटर पाहून युवा वर्गाला चांगलीच भुरळ पडली. नेहमी धावत असणाऱ्या मुंबईकराने क्षणभर थांबून या व्हिंटेज रॅलीचे स्वागत केले. सर्कलपासून सुरू झालेली रॅली वांद्रे-कुर्ला संकुलात दाखल झाली. येथेही वाहनचालकांनी रॅलीचा याचि देही याचि डोळा अनुभव घेतला. (प्रतिनिधी)>गाडी...अबालवृद्धांपर्यंत सगळ््यांनाच वाहनांच्या आकर्षणाची ओढ असते. काळानुरुप वाहनांमध्ये अमुलाग्र बदल घडत गेले. मात्र इतिहासाने हद्दपार केलेल्या कार, बाईक आणि स्कूटर आज ही चालकांच्या मनात ठाण मांडून आहेत. याचा प्रत्यय व्हिंटेज कार रॅलीत आला. व्हिंटेज रॅलीतील कारसोबत सेल्फी घेण्याचा मोह मुंबईकरांना आवरात आला नाही़
व्हिंटेज कारचा शाही थाट पुन्हा मुंबईत
By admin | Published: February 27, 2017 1:26 AM