अधिकाराचे उल्लंघन, ही कसली शोध पत्रकारिता? सुशांतप्रकरणी ‘रिपब्लिक’ला कोर्टाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 03:33 AM2020-10-22T03:33:39+5:302020-10-22T07:01:36+5:30
हत्या की आत्महत्या, याबाबत तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्ही सुशांतची हत्या झाल्याचे कसे म्हणतो? ही शोधपत्रकारिता आहे का? असे सवालही न्यायालयाने केले.
मुंबई : एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणाला अटक करावी, हे लोकांना विचारून एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही कसली शोध पत्रकारिता, असा सवाल करत उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
सुशांत आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या वृत्ताबाबत व रिया चक्रवर्तीविरुद्ध चालवलेली हॅशटॅगची मोहीम इत्यादींचा उल्लेख मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने यावेळी केला. रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या मृतदेहाचे फोटो का दाखविले? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, असे का पसरवले? असे सवाल न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीच्या वकील मालविका त्रिवेदी यांना केले. हत्या की आत्महत्या, याबाबत तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्ही सुशांतची हत्या झाल्याचे कसे म्हणतो? ही शोधपत्रकारिता आहे का? असे सवालही न्यायालयाने केले. सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी मर्यादा पाळाव्यात, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत.