लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडून उशिराने लागणाऱ्या निकालांविरोधात छात्रभारतीने सोमवारी रात्री कुलगुरूंच्या घरावरच हल्लाबोल केला. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या कलिना विद्यापीठातील घरावर हे आंदोलन झाले. फार्मसी आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांचे निकाल १६ जुलैपर्यंत घोषित करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी या वेळी छात्रभारतीच्या शिष्टमंडळाला दिल्याचा दावा संघटनेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केला आहे.बनसोडे म्हणाले की, विविध परीक्षांच्या निकालांना दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. विशेषत: फार्मसीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना देशातील संशोधन संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मुकावे लागणार आहे. कारण १७ जुलैपर्यंत या प्रवेशाची मुदत आहे. मात्र अद्याप निकाल लागले नसल्याने विद्यार्थ्यांनी इच्छा असतानाही, नोंदणी करणे कठीण झाले आहे. यासंदर्भात ठिय्या दिल्यानंतर रात्री १० वाजता कुलगुरूंनी शिष्टमंडळाला भेट दिली. शिवाय तत्काळ निकाल जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.विद्यापीठाच्या विविध पदवींच्या तृतीय वर्षाचे निकाल अद्याप प्रलंबित असल्याकडेही कुलगुरूंचे लक्ष वेधले आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवी परीक्षांचा लागण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्याबाहेरील संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यास निकालाची गरज असून निकालाअभावी विद्यार्थ्यांना नोंदणीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला या प्रवेशांपासून मुकावे लागले, तर विद्यापीठाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बनसोडे यांनी दिला आहे.
छात्रभारतीचा कुलगुरूंच्या घरावर हल्लाबोल
By admin | Published: July 11, 2017 2:47 AM