मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. तर राज्यभरात मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान, काल बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागून काही लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ करण्यात आली होती. त्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे, पण हिंसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा लोकांवर पोलिसांकडून कलम ३०७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलंय. तुम्हाला कलम ३०७ दाखल करायचं आहे ना, करा. तुम्ही ३०७ चे किती गुन्हे दाखल करता, तेच बघायचं आहे. दांडका घेऊन आलात तर आम्हालाही मर्यादा ओलांडावी लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील हिंसक आंदोलनाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत घरे जाळणाऱ्यांवर कलम ३०७ कलम लावण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कशाला बोलता आम्हाला. ही घरं कुणी जाळली तुम्हाला माहिती आहे काय? मराठ्यांनी जाळली की कुणी जाळली हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचीच लोकं घुसवता आणि तुम्हीच जाळता आणि तुम्हीच आम्हाला ३०७ शिकवता. तुमच्यासारख्या बढाया मारणाऱ्या नेत्यांमुळेच भाजपा विविध राज्यात रिव्हर्स आलाय, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
जरांगे पुढे म्हणाले की, ३०७ करीन आणि आणखी काय करीन, कशाला धमक्या देताय.करा तुम्हाला काय करायचं ते? तुम्ही ठरवलंच आहे ना राज्यात अशांतता निर्माण करायचं, त्यामुळे तुमची बुद्धी जेवढी आहे तेवढंच तुम्ही बोलणार आहे. तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण द्या नाहीतर मराठ्यांचा नाईलाज आहे. त्याला पर्याय नाही. आता आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघू. आमचं पाणी सुटलं की, आंदोलन शांततेत राहणार, पण तुम्ही किती ताकदवान आहात आणि किती कलम ३०७ लावता हे आम्हाला बघायचंच आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.