सिंधुदुर्गनगरी : शुक्रवारपासून सुरू झालेल्या डंपर चालक-मालक संघटनेच्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी भवनात घुसलेल्या आंदोलनकर्त्यांची धरपकड, कार्यालयाची नासधूस, पळापळ यामुळे जिल्हाधिकारी संकुलात एकच हलकल्लोळ माजला. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आलेल्या काँग्रेसच्या आमदार नीतेश राणे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी दालनात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी झालेल्या पळापळीत व लाठीमारीत अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. आमदार नीतेश राणे यांच्यासह सुमारे १०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा आमदार नीतेश राणे , जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर-चालक मालक संघटनेमार्फत जिल्हा प्रशासनाने घातलेल्या जाचक अटींविरोधात आंदोलन पुकारले आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारपासून सिंधुदुर्गनगरीतील प्रत्येक रस्त्यावर जिल्हाभरातून आलेले सर्व डंपर उभे करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने पासची अट शिथिल करावी, एसएमएस पद्धत बंद करावी, अशा मागण्यांसाठी शनिवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते, डंपरचे मालक व चालक गोळा झाले. आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, आमदार नीतेश राणे आदी नेते मंडळींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यातील काचा आंदोलकांनी फोडल्या. जिल्हाधिकारी दालनासमोर येऊन दारावर जोरजोरात धक्काबुक्की करण्यात आली. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गमध्ये डम्पर आंदोलनाला हिंसक वळण
By admin | Published: March 06, 2016 3:40 AM