ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 31 - मराठा समाजाच्या वतीने आज कोकणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. कणकवलीतील श्री गांगो मंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत 'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत मराठा समाज बांधवांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली 'चक्का जाम' केला. मुंबई-गोवा महामार्गावर वागदे आणि जानवली येथे टायर पेटवून मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती समजताच त्यांनी हे पेटलेले टायर बाजूला करून महामार्ग वाहतुकीस मोकळा केला. तसेच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री गांगो मंदिर येथून दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी रॅलीला प्रारंभ करण्यात आला. पू. अप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत जोरदार घोषणा देत मराठा समाज बांधवांनी ही रॅली काढली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी एस. टी. सावंत, लवू वारंग, व्ही. डब्ल्यू. सावंत, सुहास सावंत, दिगंबर सावंत, प्रकाश सावंत, बबलू सावंत, सुरेश सावंत, सुभाष सावंत, महेंद्र राणे, संतोष राणे, राजेश रावराणे, सुशील सावंत, महेश सावंत, हरेश पाटील, सोनू सावंत, किशोर राणे, भाई परब आदी उपस्थित होते. ही रॅली पटवर्धन चौकात आल्यावर महामार्गावर ठाण मांडत घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करीत आंदोलकांना ताब्यात घेत व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेले.
कणकवलीत मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण
By admin | Published: January 31, 2017 7:03 PM