लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जिल्ह्यात हिंसक वळण लागले. दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्याचे तसेच लूटमार करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही ठिकाणी लाठीमार, तर येवल्यात प्लास्टिक गोळ्यांच्या फैरी झाडाव्या लागल्या. यात कोणी जखमी झाले नसले तरी, निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या पोलीस बंदोबस्तात दिवसभर सुरू असल्या तरी, शेतकऱ्यांनी लिलावासाठी मालच न आणल्याने कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही, जिल्ह्यात संकलित होणाऱ्या तीन लाख लीटर दुधाचा सर्वांत मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला असून, अनेक ठिकाणी टँकर अडवून ठेवण्यात आल्याने दुधाचे वितरण होऊ शकले नाही.नाशिक बाजार समितीत सकाळी शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचा शेतमाल फेकून देत, काही व्यापाऱ्यांची गोदामेही फोडून त्यातील मालाची नासधूस केली आहे. येवला-कोपरगाव येथे पहाटे आंदोलकांनी टेम्पो अडविला व त्याच्या चालकाला बेदम मारहाण करीत टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे कोपरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, जमाव हिंसक झाल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पांगविण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच चिघळली. दोन ते तीन हजार शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. या आंदोलनाचे पडसाद निफाड-येवला रोडवरील लासलगाव, नैताळे येथेही उमटले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून वाहने अडविली, सकाळच्या सुमारास बाजार समितीकडे माल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर, टेम्पो अडवून त्यातील डाळिंब, आंबा, कांदे आदी माल रस्त्यावर फेकण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस व दंगल नियंत्रण पथकाने लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. वनसगावला संतप्त शेतकऱ्यांनी टायरची जाळपोळ करीत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.नैताळे येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आंबे वाहतूक करणारी पिकअप जीप आंदोलकांनी उलटी केल्यानंतर निफाड पोलीस हजर झाले. मात्र जमाव नियंत्रणाबाहेर असल्याने राज्य राखीव दलास पाचारण करण्यात आले.दिंडोरीमध्ये वाहने अडविली तालुक्यातून नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला असून बाहेरून येणारे दूध, भाजीपाला, फळे यांची वाहनेही ठिकठिकाणी अडवण्यात येऊन ते रस्त्यावरच रोखून धरण्यात आलीे आहेत. दिंडोरी बाजारपेठ व बाजार समितीत या संपामुळे शुकशुकाट दिसून आला.
नाशिकमध्ये हिंंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2017 1:21 AM