विशाल सोनटक्के, उस्मानाबाद साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवस्थानने सत्काराच्या नावाखाली अनेक व्हीआयपींबरोबरच त्यांचे वाहनचालक, गणमान्य व्यक्ती, अधिकाऱ्यांसह त्यांच्या पाहुण्यांना दागिने भेट देत कोट्यवधींची उधळण केल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या २० वर्षांत व्हीआयपी भक्तांना सोने, चांदी आणि महावस्त्राचा कोट्यवधी रूपयांचा प्रसाद वाटण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. तुळजापुरात भवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यात व्हीआयपी आणि सामान्य, असे दोन प्रकारचे भक्त असतात. देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी अर्पण करतात. त्यातूनच मंदिर संस्थान व्हीआयपी भाविकांच्या झोळीत सोन्याची मूर्ती, चांदीची तलवार, मूर्ती, रथ, महावस्त्र, बनारसी फेटा, महागड्या पैठणी साड्या व शालू अशी भेटवस्तू देतात. जगदंबेचा आशीर्वाद म्हणून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या व्हीआयपींमध्ये राज्य व केंद्र सरकारमधील आजी-माजी मंत्र्यांचा समावेश आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच आसाराम बापूपासून योगगुरू रामदेव बाबाही त्यात आहेत. मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेले स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनीही मोठ्या आनंदाने वेळोवेळी महागडा प्रसाद स्वीकारला आहे.
सासू-सारे आणि मेव्हणेही...राजकीय भाविकांपाठोपाठ व्हीआयपींच्या यादीत अग्रक्रमाने उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचेही स्थान आहे. गेल्या २० वर्षात काही जिल्हाधिकाऱ्यांचे सासू-सासरे, काही पोलीस अधीक्षकांचे मामा-मामी, तहसीलदारांचे साडू-मेव्हुणी, आयुक्तांचा मुलगा, जावई, गाडीचा चालक आणि त्यांचे मित्र यांच्यावरही प्रसादाची उधळण झाली.
दुष्काळी पथकही लाभार्थीगेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची स्थिती असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारचे पाहणी पथक येते. २० वर्षांतअनेक वेळा पथकातील सदस्यांनीही व्हीआयपी सत्कार स्वीकारलाआहे. निवडणूक निरीक्षक लाभार्थी ठरले आहेत.नियमावली करू- जिल्हाधिकारी
श्री तुळजाभवानी माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. नेत्यांसह मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी देवस्थानला पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करतात. त्याचा सर्वच भाविकांना फायदा होतो. त्यामुळे व्हीआयपींचे मंदिर संस्थांनकडून यथोचित स्वागत झाले पाहिजे, अशी भूमिका असते. मात्र पुढील काळात व्हीआयपी सत्कारासाठीची नियमावली करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.