ऑनलाइन लोकमतमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रायगड येथील हेलिकॉप्टर घटनेनंतर व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शासकीय हेलिकॉप्टरमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचे मार्गदर्शक तत्त्वं आणखी काटेकोर करुन निर्णय घेणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले. त्याचबरोबर, डीजीसीएकडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (शुक्रवारी) अलिबाग दौऱ्यावर होते. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि सहकारी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन उरकून मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.
आणखी वाचा -
हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!
VIDEO : ट्रक आणि घरावर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर
अलिबागवरून कार्यक्रम उरकून मुंबईला निघण्याकरता ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक आॅफ घेतला. हेलिकॉप्टरचा पंखा देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला लागणार तोच उपस्थित सुरक्षारक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते बालंबाल बचावले. या माहितीला प्रत्यक्षदर्र्शींनी दुजोरा दिला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून इन्कार
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करून फॅनची रिटेस्ट घेण्यात आली. त्यानंतर त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री मुंबईस सुखरूप रवाना झाले.
लोकमत वेबसाइटवर प्रथम
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची ब्रेकिंग न्यूज ‘लोकमत डॉट कॉम’वर झळकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त आले.
काळजाचा ठोका चुकला
गेल्या २५ मे रोजी निलंगा येथे खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या अपघातातून मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकारी बालंबाल बचावले होते. त्यामुळे शुक्रवारच्या प्रसंगाने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.