ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 - गेल्या आठवड्यात जे जे रुग्णालयामध्ये तीन फूट तीन इंचाच्या महिलेने एका मुलाला जन्म दिला. औरंगाबादेच लांगे दाम्पत्य बाळाचा जन्म झाल्यानं आनंदात आहेत. 21 वर्षांच्या मीरा लांगे या महिलेने सृदृढ बाळाला जन्म दिला आहे. लांगे दाम्पत्यानं या बाळाचं नाव विराट ठेवलं आहे, असं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर लांगे दाम्पत्याने आयुष्यात तिस-या सदस्य आणण्याचा निर्णय घेतला आहे. 21 वर्षांच्या मीरा लांगे आणि 35 वर्षांच्या गणेश लांगे या दोघांचे तीन वर्षापूर्वी लग्न झालं असून, हे दोघेही तीन फुटांचे आहेत. 2016च्या ऑक्टोबर महिन्यात लांगे दाम्पत्याला ही आनंदाची बातमी समजली. ज्यावेळी मीरा गर्भवती होती, त्यावेळी तिचे वजन जवळपास 29 किलोच्या आसपास होते आणि उंची तीन फूट एवढी होती. त्यामुळे डॉक्टरांनी मीराला गर्भारपणात जिवाला धोका संभवण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणेच गर्भपात करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र औरंगाबादेतून थेट जे जे रुग्णालयात आलेल्या मीराला जेजेच्या डॉक्टरांनी काहीसा दिलासा दिला.डॉ. प्रीती लुईस यांनी गेल्याच आठवड्यात मीराची प्रसूती केली आणि आता मीरा आणि तिचं बाळ दोघंही सुखरुप आहेत. मीराचा मुलगा विराट हा 2.5 किलो वजनाचा असून, त्याची उंची आता तरी इतर नवजात बाळांप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याची उंचीही वाढेल की नाही, याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केली आहे.
तीन फूट तीन इंचाच्या महिलेच्या पोटी जन्मला विराट
By admin | Published: June 14, 2017 9:06 PM