धुळे : कोपर्डीतील घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात बुधवारी पांझरा नदीतीरी एकजुटीचे विराट दर्शन घडले. धुळे जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने एकवटलेला जनसागर प्रथमच पाहायला मिळाला.मोर्चाच्या अग्रस्थानी असलेल्या तरुणींनी सुरुवातीला पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. १३ तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात ऐतिहासिक मराठा क्रांतीचे दर्शन घडले. दुपारी २ वाजता शिवतीर्थाजवळ मोर्चाचा समारोप झाला़ आयोजकांनी पार्किंगचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीचीकोंडी टळली. मोर्चाचे पहिले टोक व्यासपीठाजवळ आले, तेव्हा शेवटचे टोक हे नगावबारीपर्यंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर तरुणींनी कोपर्डी घटनेचे भीषण वास्तव संवेदनशीलतेने मांडले़ गुजरातमधील सुरत येथील सकल मराठा समाजातर्फे मोर्चेकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. बटाट्याची भाजी व पुरी असे एका पाकिटात मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)१०६ वर्षांच्या आजी सहभागीमोर्चात १०६ वर्षांच्या सुशिलाबाई भीमसेनराव पाटील या त्यांचे १०० वर्षांचे भाऊ माधव पाटील यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. त्यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.४५० मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रासमोर्चात सहभागी झालेल्या सुमारे ४५० जणांना बुधवारी कडक उन्हाचा त्रास झाला. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. ४०० जणांवर जिल्हा रुग्णालयातील मारवाडी युवा मंचच्या वैद्यकीय सेवा स्टॉलवर प्राथमिक उपचार करण्यात आले़ तर सुमारे ५५ मोर्चेकऱ्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले़ प्रथमोपचार करून त्यांना सोडण्यात आले. उन्हामुळे काहींना मळमळ, उलटी, गरगरणे आदी त्रास झाला. उन्हापासून संरक्षणासाठी अनेकांनी डोक्याला रुमाल बांधला होता, काहींनी टोपी घातली होती़
धुळ्यात विराट क्रांती मोर्चा
By admin | Published: September 29, 2016 1:39 AM