कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याची काळ्या रंगाची बजाज बॉक्सर गाडी कोल्हापुरात घेतल्याचे तपासात उघड झाले. तिचा नंबर (एम. एच. ०९ व्ही ३३४५) असा आहे. वीरेंद्र शरद तावडे (रा. ११४३ ई वॉर्ड, जय-विजय अपार्टमेंट, साईक्स एक्स्टेंशन कोल्हापूर) या पत्त्यावर नोंदणी आहे. त्याचे रजिस्ट्रेशन १९ मे १९९८ रोजीचे आहे. ही मोटारसायकल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपासून गायब आहे. त्याच मोटारसायकलीचा पानसरे हत्येसाठी वापर केल्याचा संशय ‘एसआयटी’ने व्यक्त केला आहे. दरम्यान, विशेष पथकाने तावडेची बेपत्ता टेम्पो ट्रॅक्स मोटार वाशिम येथून जप्त केली. या ट्रॅक्समध्येच पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचला होता, असे तपासात पुढे आले आहे.
पानसरे हत्येच्या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली मोटारसायकल काळ्या रंगाची बॉक्सर व स्प्लेंडर आहे. मारेकरी हे अशा रंगांच्या मोटारसायकलवरून आल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना यापूर्वी मिळाले आहे. या दोन्ही गाड्यांचे साम्य तावडेच्या मोटारसायकलशी मिळते-जुळते असल्याने ती ताब्यात घेणे तपासकामाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे तपास पथकांनी तावडेच्या पनवेल येथील निवासस्थानावर व ‘सनातन’आश्रमावर छापे टाकले होते. परंतु मोटारसायकल हाती लागली नाही. ही मोटारसायकल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येपासून गायब आहे. त्याच मोटारसायकलीचा पानसरे यांच्या हत्यमध्ये वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
तावडेने कोणत्याही पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीची फिर्याद दिलेली नाही की कुणाला विकलेली नाही. ही मोटारसायकल पानसरे हत्येच्या तपासातील महत्त्वाचा दुवा असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वाशिम येथून तावडेची टेम्पो ट्रॅक्स पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याने स्वत:च्या नावावर खरेदी न करता दुसऱ्या साधकाच्या नावे रजिस्टर करून ती आश्रमाला भेट दिली होती. या ट्रॅक्सचा वापर या दोन्ही हत्येसाठी करण्यात आल्याचे तपासात पुढे येत आहे. कोल्हापुरातील बंगला विकलातावडेने मोटारसायकलीच्या नोंदणीसाठी दिलेल्या पत्त्यावर ‘लोकमत’च्या बातमीदाराने जावून चौकशी केली असता त्याने हा बंगला कांही वर्षापूर्वी विकल्याची माहिती मिळाली. नार्कोटिक औषधांचा पुरवठा मुंबईहूनपनवेल येथील ‘सनातन’ आश्रमामध्ये शंभर साधक आहेत. या ठिकाणी पथकाने छापा टाकला असता नार्कोटिक औषधांचा साठा मिळून आला. ही औषधे आश्रमात येणाऱ्या साधकांना दिली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंबधी आश्रमातील एका डॉक्टरासह वाहनचालकाकडे चौकशी सुरू आहे. ही औषधे मुंबई येथून पुरवठा केली जातात. त्या पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही औषधे आपण ताण-तणाव व अनामिक भीती वाटते त्यावेळी सेवन करत असल्याची कबुली तावडेने दिली.