आशपाक पठाण , लातूरबदलत्या वातावरणामुळे निसर्गनियमानुसार मुुलींना शालेय वयातच मासिक पाळी चालू होते, यातून उदासीनता येऊन शिक्षणात त्याचा परिणाम होतो. हीच समस्या दूर करण्यासाठी लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात ‘कन्या सुरक्षा कवच’ हा उपक्रम हाती घेतला आहे.यात मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी माता-पित्यांबरोबरच शिक्षकांचीही असावी, म्हणून लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी तांदुळजा जिल्हा परिषद शाळेत एटीएमप्रमाणे मशीन बसवून मुलींना पाच रुपयांत नॅपकिन उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, तालुक्यात एकूण ८१ जिल्हा परिषद शाळांतील किशोरवयीन मुलींसाठी तेथील शिक्षिकांकडेच नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, सक्षमीकरण करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, यासाठीच लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुली लाजल्या़ आम्ही त्यांची समजूत घातली़ त्यामुळे या उपक्रमाला मुलींचा प्रतिसाद वाढत असल्याचे तांदुळजा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा सुपेकर म्हणाल्या़ शिक्षणाबरोबर आरोग्याची काळजी - तृप्ती अंधारे हर एक माय माझी, वाघीण झाली पाहिजे, इथे-तिथे राबण्याऐवजी ती शाळेत आली पाहिजे, हे ब्रीद घेऊन गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या मुलींचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा याविषयी काळजी घेत आहेत. तांदुळजा जिल्हा परिषद शाळेत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, आता हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या सूचनेनुसार जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
मुलींच्या शिक्षणासाठी ‘कन्या सुरक्षा कवच’
By admin | Published: February 06, 2017 1:51 AM