मुंबई : मुंबईसह राज्यातील दहा महापालिका आणि २६ जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. १६ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात होणा-या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारीपासून २१ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदी घातल्याने सोशल मीडियावर बोगस चाचण्या आणि निकाल फॉरवर्ड करण्याचा प्रकार उघडकीस आला. राजकीय सर्वेक्षणाच्याबाबतीत मोठे नाव मानले जाणा-या चाणक्य या संस्थेने सदर सर्वेक्षण केल्यासा दावा करण्यात आला. तसेच एका मराठी वृत्तवाहिनीचा लोगोही या फोटोत वापरण्यात आला. काही वेळातच सर्वेक्षणाचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होऊ लागल्या. मात्र, आमच्या वाहिनीने असा कोणत्याच प्रकारचा सर्वेक्षण अथवा त्याचा निष्कर्ष प्रसारीत केले नसून सदर फोटो बनावट असल्याचे संबंधित वाहिनीने स्पष्ट केले. मुंबईच नव्हे तर राज्यातील कोणत्याही महापालिका अथवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या जनमत चाचण्यांचे सर्वेक्षण केले नसल्याचे या वाहिनीच्या संपादकांनी स्पष्ट केले. राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा होईल अशा प्रकारे बोगस माहिती पसरवल्याबद्दल धर्मेंद्र मिश्रा या व्यक्तीने प्रभाग क्रमांक १४९ मधील भाजपाच्या सुषम सावंत व पक्षाच्या आयटीसेल विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
बोगस जनमत चाचण्या झाल्या व्हायरल
By admin | Published: February 15, 2017 3:39 AM