मुंबई : काठावरचे बहुमत मिळवत मध्यप्रदेशात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. तर मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भाजपला उत्तर दिले आहे.
राऊत यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, महाराष्ट्राची 'पॉवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. त्यामुळे चिंता करू नका, मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
तर ‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील. त्यामुळे महाराष्ट्रातही मध्यप्रदेशप्रमाणेच महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.