Vishal Patil News: सांगली जागेवरून महाविकास आघाडीतील नाराजी पूर्णपणे शमल्याचे पाहायला मिळत नाही. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत सभा घेतली. या सभेला महाविकास आघाडीतील काही नेते उपस्थित होते. या सभेत ठाकरे गटाने विशाल पाटील यांच्यावर टीका केल्याचे सांगितले जात आहे. या टीकेला विशाल पाटील यांनी थेट शब्दांत उत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विशाल पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी घेतली असून, भाजपाने दोन उमेदवार उभे केलेत, अशा प्रकारचा दावा करण्यात आला होता. यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले की, चंद्रहार पाटील का आणि कशासाठी निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत, हे येथील सर्व जनतेला माहिती आहे. या ठिकाणी काँग्रेसचा विचार खूप स्ट्राँग आहे. आमच्यात जन्मापासून काँग्रेसचाच अगदी घट्ट विचार आहे. आमच्या विचारांपासून आम्ही दूर जाणार नाही, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.
अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विशाल पाटील यांना आयोगाकडून लिफाफा चिन्ह मिळाले आहे. विशाल पाटील यांच्या लिफाफ्यात भाजपाचे पैसे आहेत. विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नुकसान होत आहे, अशा आशयाची टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली. यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले की, सांगलीची ही लढत तिरंगी नसून, थेट लढत आहे. सांगलीत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई आहे. मला काँग्रेस पक्षाचे चिन्ह मिळाले नाही, म्हणूनच मी लिफाफा या चिन्हावर लढत आहे. लिफाफ्यात पैसे नाहीत, तर काँग्रेस पक्षाचा हात आहे. ४ तारखेला लिफाफा निवडून येईल, तेव्हा या लिफाफ्यातून काँग्रेसचा हात वर येणार, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.