विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:20 AM2024-07-16T09:20:10+5:302024-07-16T09:22:14+5:30
बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदमांची पाठराखण केली आहे.
Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांकडून क्रॉस वोटिंग करण्यात आल्याने पक्षाची कोंडी झाली. या आमदारांमध्ये सांगलीतील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हेदेखील असल्याचा संशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला होता. जाधव यांचा हा दावा फेटाळत त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
"विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, हे आम्हाला मान्य आहे. सदर आमदारांच्या नावाची निष्पत्ती झाली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. मात्र यामध्ये विश्वजीत कदम यांचं नाव घेणं योग्य नाही. भास्कर जाधव असं का बोलले, हे मला समजलं नाही. जाधव यांचा हा विषय नाही," असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदमांची पाठराखण केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि विश्वजीत कदमांमध्ये संघर्ष झाला होता. सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यानंतर विश्वजीत कदम यांनी विशाल पाटलांच्या रुपाने अपक्ष उमेदवाराला ताकद देत निवडून आणले होते. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी विश्वजीत कदम यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.
जाधव नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस आमदारांच्या क्रॉस वोटिंगविषयी बोलताना भास्कर जाधव यांनी म्हटलं की, "काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्या आमदारांच्या यादीत विश्वजीत कदमांचंही नाव मी पाहिल्यासारखं वाटतंय," असं खोचक वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी केलं होतं.
काँग्रेस कारवाई करणार!
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठवला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.