Congress Vishwajit Kadam News: विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीचे शरद पवार गट समर्थित उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि महायुती आमनेसामने आल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच विधानसभेला महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा विश्वजित कदम यांनी केला.
सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे. विधानसभा मतदारसंघात मतदान कमी असते, अशात थोडी मते जरी इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलू शकतात. निवडून येण्यासाठी कष्ट करावे लागणार आहे . यासाठी पक्ष आणि उमेदवाराला मेहनत घ्यावी लागेल, कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागेल. हे सगळे जुळले तर विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, असे विश्वजित कदम म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांकडे वेगळ्या नजरेने पहिले पाहिजे
लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांकडे वेगळ्या नजरेने पहिले पाहिजे. विधानसेसाठी अजून महायुती अथवा महाविकास आघाडी यातील जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. त्यानंतर जागा वाटप ठरेल आणि मग उमेदवार ठरतील. महाविकास आघाडी म्हणून आमच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभेच्या विजयामुळे गाफील न राहता विधानसभा निवडणूक आम्ही ताकतीने लढवणार. लोकसभा निकालावरून विधानसभेची गणिते मांडणे चुकीचे असून, विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे या निवडणुकीत गाफील राहणे योग्य नाही. जिंकायला कष्ट करावे लागतील. विधानसभेला केवळ ५० ते ६० दिवस राहिले असताना पक्ष आणि उमेदवार म्हणून भरपूर तयारी करावी लागते, असे कदम यांनी स्पष्ट केले.