मुंबई : भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. या विस्तारणाऱ्या क्षेत्रातील सर्व संबंधितांना एका व्यासपीठावर आणून याबाबत चर्चा करण्यासाठी ग्लोबल एव्हिएशन समिटचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी त्याला प्रारंभ होईल. या वेळी हवाई वाहतूक क्षेत्राचा आढावा घेऊन, ‘व्हिजन २०४०’ची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘उडान’ योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच ही योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू करण्याचे सुतोवाच प्रभू यांनी केले.
या परिषदेत जगातील ८६ देशांचे हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, अशा प्रकारची ही जगातील पहिलीच परिषद असल्याचा दावा त्यांनी केला. भारताला एव्हिएशन हब बनविण्यासाठी धोरण या वेळी जाहीर करण्यात येईल. त्याशिवाय हवाई मालवाहतुकीचे धोरणदेखील जाहीर करण्यात येईल. ‘उडान’ योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या उपायांची व त्याला मिळालेल्या प्रतिसाद जनतेसमोर ठेवण्यात येणार आहे. देशात तेथे अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही, त्या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती प्रभू यांनी दिली. या वेळी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव चौबे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते.रत्नागिरी-सिंधुदुर्ग ‘उडान’मध्ये समाविष्टबोइंगच्या अहवालानुसार भारताला दरवर्षी २,३०० विमानांची गरज भासणार आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी भारतातच सुविधा व तंत्रज्ञ उपलब्ध होण्याची गरज आहे. एव्हिएशन क्षेत्राच्या विविध कररचनेबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयासोबत चर्चा सुरू असून, त्यांच्या सहकार्याने प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुढील काळात विमानतळांचा विकास राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे करणार आहे. विमान प्रवासाची क्षमता व्यापक करण्यात येईल, ज्या ठिकाणी विमानतळ नसेल. मात्र, समुद्र असेल त्या ठिकाणी समुद्री विमानाच्या माध्यमातून विमान प्रवासाची सुविधा पुरविण्यात येईल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग विमानतळाला लवकरच ‘उडान’मध्ये समाविष्ट करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.