लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशाप्रकारे सातत्याने शैक्षणिक क्रिडा, संगीत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेतलेल्या नाशिकच्या वेदांत मुंदडा या दृष्टिबाधित विद्यार्थ्याने दहावीप्रमाणे बारावीच्या परिक्षेतही ९०.३१ टक्के गूण मिळवित नेत्रदिपक कामगिरी केली आहे. तो दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये राज्यात आघाडीवर आहे.केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर वेदांत हा संगीत, कला, क्रिडामध्येही आघाडीवर आहे. नियतीने वेदांत दीड वर्षांचा असताना त्याची दृष्टी हिरावून घेतली; मात्र त्याला अष्टपैलू कामगिरीसाठी लागणारे सर्व काही कलागूण उपजत दिले. त्याने आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर चमकदार कामगिरी करून नेहमीच नेत्रदिपक डोळस विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि पालकांच्या दमदार पाठिंब्यामुळे आपल्या व्यंगावर मात करीत अभ्यासापासून खेळापर्यंत नैपुण्य मिळविले आहे. वेदांतला तबला विशारद व सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्याने तबला वाजविण्याचे चोख धडे घेत पाच परिक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत. खुल्या मैदानात आणि घराच्या आवारात पालकांच्या देखरेखीखाली वेदांत सायकल, दुचाकीदेखील चालवितो एवढेच नव्हे तर संगणकापासून तर बुध्दीबळ अन् क्रिकेटसारख्या खेळांमध्येही तो आपले कौशल्य दाखवून देतो.
२०१४-१५साली दहावीच्या परिक्षेत वेदांतने ९२ टक्के गुण मिळवून राज्यात दिव्यांगामध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. यामध्ये सातत्य ठेवत वेदांतने कला शाखेकडे न जाता वाणिज्य शाखेतून अकरावीला केटीएचएम महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या गटात प्रवेश घेत बारावीची परिक्षेत ९०.३१ टक्के गुण मिळवून नेत्रदिपक यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाचे कौतुक पालकांबरोबरच नाशिकच्या संपूर्ण लोकमत परिवाराला आहे. वेदांतचे वडील उमेश मुंदडा हे लोकमत नाशिक आवृत्तीत जाहिरात प्राप्ती विभागात वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. वेदांतला कधीही त्याच्या व्यंगाची जाणीव होऊ द्यायची नाही, आणि त्याला सर्वच क्षेत्रात त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे कामगिरी करण्यास प्रोत्साहित करायचे ध्येय ठेवत वडील उमेश व आई जयश्री, आजी-आजोबांनी त्याचे आत्मविश्वास उंचवत ठेवले. दहावीच्या परिक्षेत वेदांतने जशी चमकदार कामगिरी केली त्याचप्रमाणे त्याने बारावीच्या परिक्षेतही पुनरावृत्ती केली. दिव्यांगमुलेदेखील डोळस मुलांपेक्षा कमी नसतात, गरज असते सर्वप्रथम पालकांनी त्यांच्या बुध्दीमत्तेवर विश्वास दाखविण्याची. समाजात अनेकप्रकारचे दिव्यांग मुले आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन सातत्याने विविध प्रकारच्या संधी पालकांनी उपलब्ध करून दिल्यास ते समाजात आई-वडिलांचे नाव मोठे केल्याशिवाय राहत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे उमेश मुंदडा यांनी आपल्या भावना व्यक्त क रताना सांगितले.