लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक विभाग, मत्स्य विभाग, गृह विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग (गौण खनिज) आणि फलोत्पादन विभागांना महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीने भेटी दिल्या. सर्वपक्षीय २५ सदस्य असलेल्या समितीमध्ये फक्त नऊच सदस्य उपस्थित होते. रायगड जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ६६० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. समितीचा पूर्व नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांनी अचानक जिल्ह्याला भेट देण्याचे ठरविले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. १३ आणि १४ जुलै या दोन दिवसांमध्ये समिती जिल्ह्यातील विविध विभागांना भेटी घेऊन तेथील आढावा घेणार आहेत. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन समितीने आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. जिल्ह्याची भौगोलिक रचना मोठी असल्यामुळे सदस्यांचे दोन गट करण्यात आले. एक गट कर्जत, खालापूर, पेण, पनवेल तालुक्याच्या दिशेने गेला तर, दुसरा गट हा रोहे, माणगाव, महाड, पाली, पोलादपूर तालुक्याला भेट देण्यासाठी रवाना झाला. या गटामध्ये समितीचे कार्यकारी प्रमुख आमदार उदय सामंत होते. पहिल्या गटामध्ये विधिमंडळ अंदाज समितीचे माजी अध्यक्ष श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील होते. आमदार सामंत यांच्या गटाने रोहे तालुक्यातील सुदर्शन केमिकल कंपनीला भेट दिली. रेती उत्खननाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथील पाहणी करण्यात आली. रोहे तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी कंपनीलाही भेट दिली, तसेच तालुक्यातील फलोत्पादन विभागाचीही पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पास्को कंपनी, एमआयडीसी, सुधागड पाली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीची पाहणी करून आजच्या दौऱ्याची सांगता केल्याचे समिती प्रमुख आमदार उदय सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.समितीच्या पहिल्या गटातील आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतची माहिती आताच देता येणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.समिती १४ जुलै रोजी अलिबाग तालुक्यातील मांडवा व मुरुड तालुक्याला भेट देणार आहे. समितीने ज्या विभागांचा दौरा केला आहे त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना आम्ही पत्रकारांशी बोलू असेही आ. सामंत यांनी सांगितले.
विधिमंडळ अंदाज समितीची जिल्ह्याला भेट
By admin | Published: July 14, 2017 3:28 AM