- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सॅनिटरी नॅपकिन्सची भेट दिली जाणार आहे. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन्स वस्तू सेवा करातून (जीएसटी) न वगळणल्याच्या निषेधार्थ ही भेट दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.‘सॅनिटरी नॅपकिन्स’वरील जीएसटी रद्द व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही देण्यात आले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना यासंदर्भात विनंती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही राज्य सरकारतर्फे कोणतीही कृती करण्यात न आल्याने ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा जीएसटीत समावेश झाला. यातून राज्यकर्त्यांची महिलांच्या आरोग्याबाबत असंवेदनशीलता स्पष्ट होते. याच्या निषेधार्थ पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना नॅपकीन भेटीदाखल पाठविण्याचा निर्णय घेण्यातआला असून प्रसंगी यामागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.